रत्नागिरीतील भोंदूबाबा पाटीलच्या रासलीलाचा पर्दाफाश
भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलला अटक करण्यात आल्यानंतर अनेक घटना पुढे येत आहे. बाबाने अनेक मुलींना फसवले असून काहींना डांबून ठेवले होते. तर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दरवर्षी लग्न करत असल्याचे पुढे आलेय.
रत्नागिरी : भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलला अटक करण्यात आल्यानंतर अनेक घटना पुढे येत आहे. बाबाने अनेक मुलींना फसवले असून काहींना डांबून ठेवले होते. तर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दरवर्षी लग्न करत असल्याचे पुढे आलेय.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच या बाबावर कारवाई करण्यात आलीये. रत्नागिरीतला या पाटीलबाबाचे हे कारनामे पाहून याला बाबा म्हणावं की अभिनेता असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कारण कधी हा बाबा फिल्मी गाण्यावर नाचताना दिसतो. कधी स्वत:ला स्वामींचा अवतार असल्याचं सांगतो (मी स्वामी समर्थ असल्याचा आव हा बाबा आणतो.) तर कधी महिलांना अश्लिल भाषेत शिव्या देखील घालतो. त्याचे हे सगळे प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक संघटना त्याच्याविरोधात एकत्र आल्या.
श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बाबा असं या भोंदूबाबाचं नाव. हा भोंदूबाबा पूर्वी रत्नागिरी पोलीस खात्यात वाहन चालक म्हणून नोकरीला होता. मात्र नोकरी सोडली आणि त्यानं अशी भोंदूगिरी सुरु केली. रत्नागिरीतल्या झरेवाडीत स्वताचा मठ स्थापन केला.. अनेक भक्त जमवले.. मात्र एका धाडसी महिलेनं त्याचे सारे प्रताप उघडकीस आणले..
पाटील बाबामुळे झरेवडीच्या गावाची बदनामी झाली. त्यामुळे तातडीने हा मठ झरेवाडीतून बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होतेय. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदनही दिलंय. बाबाविरोधात बातम्या आल्यानंतर आता ग्रामस्थांनी एक सभा घेऊन याबाबत निर्णय घेतलाय.