विशाल करोळे झी 24 तास औरंगाबाद : सध्या प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर आहे. ग्रामीण भागात चुलीचा अपवाद वगळला तर जेवण बनवण्यापासून आंघोळीचं पाणी तापवण्यापर्यंत गॅसवरच अवलंबून राहावं लागतं. मात्र याच घरगुती गॅसमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचा दावा केला जात आहे.याच दाव्यामागचं सत्य झी 24 तासनं शोधून काढलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाकाचा गॅस हा आता प्रत्येक घराची गरज बनला आहे. मात्र याच गॅसशेगडीबाबत व्हायरल होत असलेल्या एका मेसेजनं खळबळ उडाली आहे. स्वयंपाकघरातल्या शेगडीमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला. 



घरगुती गॅस शेगड्यांबाबत अमेरिकेत नुकताच एक सर्वेक्षण करण्यात आलं, त्याआधारे प्रदुषणाबाबत हा दावा करण्यात आला. स्वयंपाकघरातील गॅस शेगड्यांमुळे जवळपास 5 लाख कार्सपेक्षा जास्त प्रदूषण होतं. गॅस शेगडीमुळे तीन चतुर्थांश मिथेन गॅस तयार होते. 


 


शेगडी बंद असेल तरीही सिलिंडरमधून हा गॅस सतत हवेत विरत असत. लाखो घरांमधून निघालेला गॅस ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला. 


अनेकांच्या स्वयंपाक घरात नायट्रोजन ऑक्साईड गॅसची पातळी गरजेपेक्षा जास्त असून त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात असं शास्त्रज्ञांनी म्हंटल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. हा प्रश्न गृहिणींच्या आरोग्याशी निगडीत असल्यानं झी 24 तासनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा यातली काही तथ्यं समोर आली.


अलिकडेच स्वयंपाकघरातील गॅस शेगडीतून होणा-या प्रदुषणावर अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात संशोधन करण्यात आलं. त्यात स्वयंपाक घरातील गॅस शेगडीतून 26 लाख टन मिथेन गॅसचं उत्सर्जन होत असल्याचं समोर आलं. हे प्रदुषण 5 लाख कार्सच्या प्रदुषणापेक्षाही जास्त आहे. हा अभ्यास इन्व्हार्यमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 


अमेरिकन संशोधकांच्या दाव्याला भारतीय तज्ज्ञांनी अद्याप पुष्टी दिलेली नाही. स्वयंपाकघरातील गॅसमुळे प्रदूषण होत असल्याचा दावा खरा असला तरी  घराबाहेर झाडं लावल्यास किंवा इनडोअर प्लँटेशन केल्यास हे प्रदूषण कमी होऊ शकतं. त्यामुळे उगाचच घाबरून जाऊ नका..गॅसचा अनावश्यक वापर टाळा, प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करा.