फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण, म्हणाले.. तेव्हाच त्यांचा अपमान होतो
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल आपले भाषण अर्धवट सोडून निघून गेले. यावरून राज्यपालांवर टीका होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केलीय.
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ घातला. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेध आमदारांनी केला.
आमदारांच्या या कृतीवर नाराज होत राज्यपाल कोश्यारी यांनी अवघ्या दोन मिनिटात आपले भाषण आटोपते घेत तिथून निघून गेले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांनी केलेल्या या कृतीचा निषेध केला होता. तर, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपालांवर टीका केली.
राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात आहे हे महाराष्ट्रात दिसतयं. १२ आमदारांचा निर्णय घेतला जात नाही. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा ठेवणार नाही असं समजून कुणी काम करत आहे. आणि त्यावर भाष्य न केलेलेचं बरे, असे पवार म्हणाले.
राज्यपालांवर होणाऱ्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. एखादी जाणीवपूर्वक घटनाबाह्य कृती करायची आणि नंतर त्याविरोधात बोलायचं. राज्यपालांच्या बाबतीतही तेच होतंय. राज्यपाल यांचा एक प्रकारचा नरेटीव तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय.
राज्यपाल ही घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते घटनेप्रमाणे काम करतात. महाविकास आघाडीकडून संविधानात न बसणारं काम केलं जातं. त्यांना राज्यपाल विरोध करतात म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं, त्यांचा अपमान केला जातो. हे अतिशय चुकीचे आहे, असं फडणवीस म्हणाले. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.