मुंबई : महाराष्ट्रातील चार आकांक्षित जिल्हे, वाशीम, नंदूरबार, उस्मानाबाद आणि गडचिरोलीचा समावेश पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत करण्यात यावा, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच स्थलांतरित मजूर परत आलेल्या 6 राज्यातील 116 जिल्ह्यात ही योजना पंतप्रधानांनी सुरू केली आहे. स्थलांतरित मजूरांना उपजिविकेचे साधन मिळावे, हा त्याचा हेतू आहे. यात या 6 राज्यातील 27 आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश आहे. आगामी 125 दिवस त्यात स्थलांतरित श्रमिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सुद्धा भक्कम होणार आहेत. 


या अभियानात महाराष्ट्रातील चार आकांक्षित जिल्ह्यांचा (अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट) समावेश करण्यात यावा, त्यामुळे याही जिल्ह्यांमध्ये परत आलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध होईल आणि तेथील पायाभूत सुविधा भक्कम होण्यास मदत मिळेल, असे त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या कोरोनाच्या टाळेबंदीमुळे या मजुरांना त्यांच्याच जिल्ह्यांत रोजगार यामुळे उपलब्ध होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.