नवी मुंबईत बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला अटक
बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे
नवी मुंबई : बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील बाद झालेले ड्राव्हींग लायसन्स चोरुन त्याद्वारे सुमारे अडीचशेहुन अधिक ड्रायव्हींग लायसन्स बनविल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात बनवाट लायसन्स, नवी मुंबई, पनवेल, ठाणे आरटीओचे रबरी स्टँम्प व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आरटीओ एजंट दीपक वेंकट सूर्यवंशी (२५), पवनेल येथील फिनिक्स झेरॉक्स सेंटरचा चालक डेरियल लोबो (५४) तसेच मोटर ड्रायव्हींग स्कूल चालक धीरज तथा नरेंद्र मौर्या (२५) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरटीओ एजंट दीपक सूर्यवंशी याच्याकडे लायसन्स बनविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून तो फक्त फोटो घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सूर्यवंशी हा नवी मुंबई आरटीओ कार्यालयातून चोरलेल्या रद्द लायसन्स कार्डाचे पनवेलमधील फिनिक्स झेरॉक्स सेंटरमधून कलर झेरॉक्स काढून घेत होता. त्यानंतर त्याच्यावर त्या व्यक्तीचा फोटो चिकटवून तसेच त्या कार्डामध्ये जुन्या लासन्समधून काढलेली चिफ लावून, त्यांना बनावट लायसन्स बनवून देत होता, असे पोलिसांनी सांगितले.