मुंबई : आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अल्पसंख्यांक सेलची  बैठक झाली. ही बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी प्रवेश केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये इतकीच भरपाई मागील देवेंद्र फडवणीस सरकारने दिली होती. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी मंत्र्यालयात अनेक वेळा चकरा मारल्या होत्या. त्यांना न्याय मिळाला नाही. धर्मा पाटील यांच्याकडे चार एकर जमीन होती. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती. त्यांना देण्यात आलेली मदत अल्प होती, असे त्यांचे म्हणणे होते. मला नियमानुसार रक्कम देण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती.


त्यांना न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला आहे. पाटील यांनी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 



संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर धर्मा पाटील यांचे तीन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. मात्र धर्मा पाटील यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.