माधव चंदनकर, गोंदिया : दारूच्या दुष्परिणामांची यादी न संपणारी आहे. पण गोंदियातल्या एका शेतकऱ्यानं दारूचा विधायक वापर केलाय. भातपिकावर फवारणीसाठी चक्क दारूचा वापर केलाय. फवारणीसाठी दारूचा वापर केल्यानं पिकाला फायदा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदियातल्या चरगावचे प्रतिक ठाकूर भातपिकावर फवारणी करतात. आता तुम्ही म्हणाल, फवारणीत ते काय वेगळं?.... फवारणीत वेगळं काही नाही, फवारणीसाठी म्हणून वापरलं जाणारं किटकनाशक आगळं वेगळं आहे. हे किटकनाशक आहे देशी दारू. प्रतिक ठाकूर देशी दारूचा भातपिकावर फवारणीसाठी वापर करतात. देशी दारूची नव्वद मिलीची बाटली त्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे. प्रतिकप्रमाण इतर शेतकऱ्यांचाही हा प्रयोग यशस्वी ठरतो आहे.


कृषीविभागासाठी हा प्रयोग नवा नाही. पण कोणत्याही कृषी विद्यापीठानं पिकांवरील मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. पण या मद्यप्रयोग परिणामकारक असल्याचं कृषीशास्त्रज्ञ सांगतात.


दारू दवा असते असं कुणीतरी म्हटलं होतं. हे वाक्य कोण्या तळीरामानं त्याच्या सोईसाठी म्हटलं असावं असं वाटतं होतं. प्रतिक ठाकूर या शेतकऱ्याच्या भाताच्या पिकासाठी दारू दवा झालीय असं म्हणता येईल.