हमीभावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूधवाटप
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.
कोल्हापूर: गायीच्या दुधाला हमीभाव मिळावा यासाठी कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध नोंदवला. पाण्याच्या बॉटल इतकाही दर दुधाला नसल्याने दर द्या नाहीतर फुकट घ्या असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.
दूधाला वाढीव दर देणे शक्य नाही - डोंगळे
दरम्यान, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांनी गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर द्यावा.अशी मागणी केलीय. दरम्यान जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि दूध संघांची स्थिती,पाहता २७ रुपये दूध दर देणे सध्यस्थीतीत शक्यच नसल्याच, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी स्पष्ट केलं.
दुधाचे भाव पडण्यापेक्षा सरकारने ग्राहकाला अनुदान द्यावं - शेट्टी
दरम्यान, दुधाचे भाव पडण्यापेक्षा सरकारने एकतर ग्राहकाला अनुदान द्यावं किंवा उत्पादकांना भाववाढ करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. उत्पादकाला प्रतिलिटर दुधामागे २८ ते ३० रुपये लिटर उत्पादन खर्च लागतोय आणि शासन दुधाला अवघा १७ ते १८ रुपये प्रतिलिटर भाव देतंय हे शेतकऱ्यांचं शोषण असल्याची टीका शेट्टी यांनी केलीय. भेसळ माफियांवर सरकारने कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.