ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ
शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती
लातूर : ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळामुळे खरीपाची पीकं वाळून गेली आहेत. जनावऱांना चाराही मिळत नाही. एकूणच परिस्थिती भीषण आहे.
देशात दिवाळीची धामधूम सुरु असताना महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडला. लातूर जिल्ह्यात सरकारने १० पैकी शिरूर अनंतपाळ या एकाच तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केलाय. पण थेट शेतावर जाऊन पाहिलं तर परिस्थिती भयानक आहे. लातूर जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या फक्त ६०% पाऊस झालाय. त्यामुळे खरीपातले सोयाबीन, तूर पावसाअभावी वाळून गेलेत. आणि फक्त २४ टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.
मांजरा नदी काठच्या अनेक गावातला उभा ऊस वाळून गेलाय. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. एकूणच लातूर जिल्ह्यातली परिस्थिती अतिशय गंभीर असतानाही सरकारने दुष्काळ जाहीर न केल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. माय-बाप सरकारनं शेतकऱ्यांचा असंतोष भडकण्याआधी बळीराजाकडे लक्ष देण्याची गरज आहे.