प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांनाही बसलाय. डिझेल दरवाढीमुळं ट्रॅक्टर चालकांनी शेतीच्या मशागतीचे आणि मळणीचे दर वाढविल्यामुळं शेतकरी चांगलाच हैराण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांसह शेतकरीही संकटात सापडलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कापशी इथले शिवाजी सावंत हे देखील ट्रॅक्टर चालकांनी मळणी आणि मशागतीचे दर वाढविल्यामुळं हैराण झालेत. ट्रॅक्टर मालकांनी डिझेल दरवाढीचे कारण देत मळणीचे आणि मशागतीचे दर वाढवलेत.  


पूर्वी सोयाबीन मळणीसाठी शेतकऱ्याला 1 गोळी पोत्यासाठी 12 मापटी भुईमुग द्यावं लागत होतं. आता 1 गोळी पोत्यासाठी 16 मापटी सोयाबीन ट्रॅक्टर चालकाला द्यावं लागतंय. तर एक एकर शेत नांगरटसाठी पूर्वी ट्रॅक्टर चालकाला शेतकऱ्याला सोळाशे रुपये द्यावे लागत होते. मात्र आता त्याचसाठी 2 हजार रुपये मोजावे लागतायत.  


ट्रॅक्टरचे भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं ट्रॅक्टर चालक सांगतायत. इतकंच नाही काही गावातील ट्रॅक्टर चालकांनी थेट गावातील चौकात दरवाढीचा बोर्डच लावलाय. मात्र यामुळे शेतकरी नाराज आहेत. 
 
भुईमुगाचे पडलेले दर आणि त्यात ट्रॅक्टर भाडेवाढ यामुळं शेतकरी दुहेरी कात्रीत सापडलाय. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करुन शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.