`हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान`
प्रगत विज्ञान असताना चुकीची माहिती प्रसारित करत असल्याचा आरोप
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पावसाळा म्हटलं की लगबग सुरू होते ती पेरण्यांची. शेतकरी राजा बी बियाणे आणि खते विकत घेत पेरतो. मात्र अनेक वेळेस त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट येतं. कारण हवामान विभागाने चुकीचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतं. या वर्षीही असा चुकीचा अंदाज दिल्याचा आरोप हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.
पुण्याच्या पाषाण येथे मान्सून विभागात गेले तेरा वर्ष काम करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार अंदमान निकोबार बेट यांमध्ये मान्सूनचा आगमन झालेलं नसताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने चुकीच भाकीत वर्तवले आहे. खत आणि बियाणे उत्पादकांच्या फायदयसाठी आणि शेअर बाजारातील पातळी उंचवण्यासाठी अशी खोटी भाकीत वर्तविली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. शेतीतज्ञ ही नेहमी या भाकीताबाबत संशय व्यक्त करत असून प्रगत विज्ञान असताना चुकीची माहिती प्रसारित करत शेतकऱ्याला अडचणीत आले जात असल्याचे दुजोरा त्यांनीही दिला आहे.
विमा कंपन्या आपला पीकविमा प्रीमियम लवकर वसूल व्हावे आणि वेळेवर पावसाच्या भीतीने विमा काढण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी ही शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची चर्चा कृषी क्षेत्रात आहे आता शासनाने याबाबत विशेष सखोल चौकशी करत बळीराजाला न्याय देण्याची गरज आहे.