मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे, फडणवीसांची टीका
जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचा आरोप
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचे ते म्हणाले.
यापूर्वी २५ हजार आणि ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण आता ती मदत द्यायची नसल्याने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.
नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत असल्याचे ते म्हणाले. पण केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा आणि फसवणूक केल्याचे ते म्हणाले.
किमान शेतकर्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील असे वाटले नव्हते असे फडणवीस म्हणाले. हा शेतकर्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत असल्याचे ते म्हणाले.