जालना : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता 48 तासांहून कमी कालावधी शिल्लक आहे. पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे. त्यातच पीकविमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील विविध भागात पीकविमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लावल्या आहेत. या रांगा वाढतच चालल्या असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऑनलाईन अर्ज भरताना येणा-या तांत्रिक अडचणी यामुळे याधीच शेतक-यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला होता. 


यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असंही सांगितलं. असं असलं तरी बँकाबाहेर अर्ज भरण्यासाठी शेतक-यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. शनिवारी नांदेडच्या भोकरमध्ये एका शेतक-याचा रांगेत उभे राहून मृत्यू झाल्याचीही दुर्दैवी घटना घडली होती. 


आता मुदत संपण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिले असताना बहुतांशी शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवावी, त्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती करावी अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात येतेय.