मुंबई : शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये कांदा अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. यात पहिल्या टप्प्यात संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले. मात्र अजुनही बहुतांश शेतकरी कांदा अनुदान मिळण्याची वाट पाहात आहेत. शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज करून, ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी देखील त्यांच्या खात्यावर अनुदान अजून जमा झालेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील काही निवडक गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. या गावातील शेतकऱ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झालेले नाही.


तसेच आता पेरणीची वेळ आल्याने हातात पैसे असणे गरजेचे आहे. कारण सतत ४ वर्षापासून दुष्काळाचा मार सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात शेतीतून पैसे आलेले नाहीत, म्हणून कांदा अनुदान आल्यास काहीसा दिलासा मिळेल, म्हणून लवकरात लवकर अनुदान बँक खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


राज्याच्या पणन महासंघाने सर्व प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे पाठवल्याचं सांगितलं आहे. मात्र मंजुरी नसल्याने अनुदान अजून बँक खात्यात येणार नाही. मंजुरीनंतर लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटला जमा करणार असल्याचं पणनकडून सांगण्यात आले आहे.


राज्य सरकारने १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ दरम्यानच्या शेतकऱ्यांना हे अनुदान देऊ केलं होतं. यानंतरही अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्यास मुदत वाढ दिली होती.