अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेल्या विहार तलावात एका 18 वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. फर्याद अली खान असे या 18 वर्षे मुलाचे नाव असून तो पवईच्या मिलिंद नगर भागातील रहिवासी आहे. दुपारच्या सुमारास फर्याद अली खान हा आपल्या दोन मित्रांसह विहार तलाव परिसरात फिरायला गेला होता. त्यावेळी त्याला या तलावात दोन जण बुडत असल्याचे निदर्शनास आले. या बुडत्यांना फर्यादने वाचवले खरे पण त्याचा जीव वाचवायला कोणी आले नाही. यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुडणाऱ्या दोघांना वाचवण्यासाठी फर्यादने आपल्या मित्रांच्या मदतीने मानवी साखळी बनवली. त्या दोघांना तलावाबाहेर काढण्यात तो यशस्वी देखील झाला. परंतु अचानक फर्यादचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. अखेर काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना ही घटना कळवली आणि पोलीस अग्निशमन दलाच्या सोबत घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. 



अखेर तासाभरानंतर फर्यादला तलावाबाहेर काढण्यात आले आणि जवळच असलेल्या पवई रुग्णालयात दाखल केले असता तपासाअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. आपल्या जीवाची पर्वा न करता तलावात पडलेल्या दोघांना वाचविले. परंतु या प्रयत्नात फर्याद याचा जीव गेला. त्यामुळे पवई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.