जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग
सासऱ्याच्या तक्रारीवरून दोन्ही जावयांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी : अधिक मासातल्या धोंड्याच्या जेवणाचा शिर्डीत एक वेगळाच रंग पाहायला मिळाला. शिंगणापूर गोपाळवाडा इथे धोंड्यासाठी आलेल्या दोन जावयांनी धोंडा जेवणाचा आनंद लुटला. मात्र दारुच्या नशेत असलेल्या या जावयांनी जेवणानंतर सासू-सासऱ्यासह पत्नीची लाकडी दांड्याने धुलाई केली. सासऱ्याच्या तक्रारीवरून दोन्ही जावयांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावई गजाआड
जावयांनी केलेल्या मारहाणीत सासू सरला खांडेकरच्या उजव्या हातावर आणि पायाच्या घोट्याजवळ तसंच सासरे भगवान यांच्या उजव्या खांद्याजवळ तर पत्नी रंजना हिच्या पाठीवर जबर मारहाण केली. त्यात तिघेही जखमी झाले. तिघेही जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला आले त्यांनी वरील दोन्ही जावयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन मद्यधुंद जावयांना गजाआड केलं.
काय होतं कारण?
भगवान आणि सरला खांडेकर यांच्या मुलीचं अर्थात रंजना हिचं बिरुनाथ जगन्नाथ संसारे याच्याबरोबर लग्न झालंय तर दुसर्या मुलीचं बाळू उर्फ सर्जेराव देवराम याच्याबरोबर लग्न झालंय. सासू-सासर्याकडून जावयाचा मान घेत यथेच्छ पाहुणचार घेतल्यानंतर 'रंजनाला मी घेऊन जातो' असं बिरुनाथ यानं म्हटलं... आणि तिला बळजबरीने घराबाहेर काढू लागला. रंजनाने नवर्याबरोबर जाण्यास विरोध दर्शविला. रंजना आपल्याबरोबर येत नसल्याचं लक्षात येताच बिरुनाथ आणि दुसरा जावई बाळू उर्फ सर्जेराव या दोघांनी मिळून तिथेच पडलेल्या लाकडी दांडक्याने सासू-सासरे आणि रंजना या तिघांना मारहाण केली.