Pune Students Sucide: शिक्षण, करिअर, लाईफस्टाइल अशा विविध गोष्टींचा तरुणपणात दबाव घेतला जातो. यातून तरुण वयात आयुष्य संपविण्याचा निर्णय घेण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले जाते. महाराष्ट्रासह देशभरात तरुणपणात आत्महत्या करण्याची अनेक प्रकरणे दररोज समोर येत असतात. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महाविद्यालयात खळबळ माजली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


वसतिगृहात घेतला गळफास


ओम कापडणे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा होता. वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी गळफास घेतला. ही माहिती मिळताच हेल्परायडर्स संघटनेचे पंकज घरडे आणि अभिजित मेश्राम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ओम याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.


ओम मूळचा नाशिक येथील आहे. तो विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दल त्याचे महाविद्यालय आणि जवळच्या मित्रांकडे चौकशी केली जात आहे.  


पोलिसांकडून तपास सुरु 


घटनास्थळी चिठ्ठी आढळून आलेली नाही. ओमने हे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू आहे, असे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितले.


नववीतल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं आयुष्य


काही दिवसांपुर्वी चंद्रपूर येथे नववीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवले होतं. आत्महत्या केलेला विद्यार्थी हा चंद्रपुरातील ख्यातनाम खासगी मिशनरी शाळेत शिकत होता. सार्थक असे या विद्यार्थ्याचे नाव असून नववी इयत्तेत होता. त्याने घरीच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पालकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. 


अभ्यासाचा प्रचंड दबाव आणि शाळा कोचिंग क्लासेस येथील अभ्यास आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील हनुमान खिडकी भागातील विद्यार्थ्याचे कुटुंबीय आणि शाळेतील शिक्षक यांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. 


सार्थक हा तसा अगदी  सर्वसामान्य दिसणारा विद्यार्थी होता. तो असे काही करेल असे कधीच वाटले नव्हते. मात्र अभ्यास आणि सिद्ध करण्याचा दबाव यामुळे तो पुरता कोलमडला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नववीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने पालक वर्तुळात मात्र चिंतेचे वातावरण आहे.