गर्भपिशव्यांचे मारेकरी! बीड जिल्ह्यातल्या महिला आक्रमक, कडक निर्बंध लावण्याची मागणी
राज्यात गर्भपिशवी काढण्याचं रॅकेट सक्रीय असून ऊसतोड महिलांच्या जीवाशी खेळ सुरु आहे
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : कोरोनात गर्भाचे मारेकरी या झी 24 तासच्या सीरिजनंतर बीड जिल्ह्यातल्या महिला आक्रमक झाल्या आहेत. आज रस्त्यावर उतरत महिलांनी प्रशासन तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बीडच्या महिला अधिकार मंचाच्यावतीनं केज शहरात मोर्चा काढण्यात आला.
कारण नसताना गर्भ पिशवी काढण्यावर कडक निर्बंध घालावेत त्यासाठी तात्काळ कायदा करावा अशी मागणी या महिलांनी केली आहे. तसंच ज्या महिलांची गर्भपिशवी काढण्यात आलीय. त्या महिलांना पेन्शन लागू करावी अशी मागणीही मोर्चेकरांनी केली आहे.
ऊसतोड महिलांच्या जीवाशी खेळ
कोरोना काळात नॉन कोविड शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या होता. मात्र हा केवळ दिखावा होता. कोरोना काळात राज्यात गर्भपिशव्या काढण्याचं रॅकेट पुन्हा सक्रीय झालं. बीड जिल्हा या गोरखधंद्याचं केंद्र ठरलं.
बीडच्या अनेक खासगी दवाखान्यांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू होता. लॉकडाऊन काळातल्या पंधरा महिन्यात तब्बल 651 महिलांची गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातल्या बहुतांश महिला या ऊसतोड कामगार आहेत. विशेष म्हणजे गर्भपिशवी काढायची असेल तर जिल्हा शल्यचिकित्सक किंवा शासकीय वैदयकीय अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाच्या डोळ्यासमोर कायदा धाब्यावर बसवून हा धंदा सर्रास सुरू होता.
बीड जिल्ह्यात महिला मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आहेत. खाण्यापिण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर यामागे आरोग्याचं कारण देत असले तरी सुत्रांच्या माहितीनुसार गर्भपिशवी विक्रीमागे एक मोठं रॅकेट सक्रिय आहे.