नंदूरबार : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेला महाराष्ट्राचा वीरपुत्र मिलिंद खैरनार यांच्यावर नंदूरबार जिल्ह्यातल्या त्यांच्या बोराळे या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या शोकाकुल वातावरणात मिलिंद यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद जवान मिलिंद खैरनार यांना निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. मिलिंद यांच्या हौतात्म्यानं धुळे आणि नंदुरबारसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलीय. 


तत्पूर्वी आज सकाळी चंदीगडच्या वायूसेना स्टेशनमध्ये या शूरवीराला अंतिम सलामी देण्यात आली. खैरनार यांचं पार्थिव आज सकाळी ओझर विमानतळावर आणलं. त्या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर साक्रीमार्गे नंदूरबार जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळगावी त्यांचं पार्थिव नेण्यात आलं. 


काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना मंगळवारी कमांडो मिलिंद खैरनार धारातीर्थी पडले. ते वायूसेनेच्या गरुड कमांडो पथकाचे सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये त्यांची प्रशिक्षणासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी बांदीपोऱ्यात लष्करानं उघडलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये भाग घेतला. पण दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले आणि उपचाराआधीच त्यांनी प्राण सोडला.