परभणी : मराठवाड्यावर अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे काही भागातील खरीप पिकांना दिलासा मिळाला. परभणी आणि जालन्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरीप पेरणीनंतर दोन महिन्यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मराठवाड्यात सर्वदूर हा पाऊस झाला नाही. परिणामी कोमेजलेले आणि करपलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होणार नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या आधारावर आतापर्यत पिकं जगवली त्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. तूर, कपाशी, हळदीला या पावसाचा फायदा होणार आहे. 


सुरूवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरणीनंतर पिकांची वाढ झाली नाही. वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटली. परिणामी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात खरीपाला मोठा फटका बसला. पिकं करपल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.


दोन दिवस मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस झाला. मात्र या पावसामुळे पिकांचे मरण आठ दिवसांनी पुढे ढकलले गेल्याची चर्चा आहे. लघु आणि मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. त्यामुळे मराठवाड्याला आजही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे.