अखेर मुख्यमंत्र्यांचे मौन सुटले; काढली भाजपची वैचारिक पातळी
पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेले आरोप आणि मविआ सरकारमधील नेत्यांवर होणाऱ्या कारवायानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया देत भाजपची वैचारिक पातळी बाहेर काढली आहे.
मुंबई : आपण कुणासोबत आघाडीत असलो आणि तो पक्ष चुकत असला तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल ते करणं मला भाग आहे. कुणी कुणाला बांधील नसतं. आमची आघाडी झाल्यानंतरही काही जण मी पुन्हा येईन म्हणत होते. पण, अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावलाय.
सध्या ज्या पद्धतीने भाजप चालले आहेत, ते पाहता ते सुधारणार आहेत का? असा प्रश्न पडतोय. त्यांची आणि आमची युती सुरुवातीच्या काळात वैचारिक पातळीवर झाली होती. पण, आता त्यांची वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही अशी खोच टीका करतानाच कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हे सुदृढ लोकशाहीसाठी हानीकारक
तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी सत्ता दिली. एकमेकांवर चिखलफेक करायची, त्याला बदनाम करायचं आणि वाट्टेल ते आरोप करायचं. बघा, आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात राहणारे आहेत हे दाखवण्याचे गलिच्छ प्रकार सुरू झाले आहेत. हे सुदृढ लोकशाहीसाठी हानीकारक आहे, असे त्यांनी सांगितले.