पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Pune Crime News: पुणे शहर काल हत्येच्या घटनांनी हादरले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. तर, त्याचबरोबर एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव कुलकर्णी यांचीदेखील अज्ञात व्यक्तीनी हत्या केली होती. या दोन घटनांनी पुणे शहर हादरले होते. वासुदेव कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, तीन आरोपी असून ते अल्पवयीन आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत होते. त्याचवेळी तीन जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. कुलकर्णी यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांची हत्या का करण्यात आली, याचा शोध पोलिस घेत होते. तसंच, नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना घडली होती. त्यामुळं शहरातही एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी हत्येच्या तपास करत असतानाच समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. मोबाइलचे हॉटस्पॉट न दिल्याने वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही हत्या तीन अल्पवयीन मुलांनी केली आहे. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्या मोबाईलचे हॉटस्पॉट या अल्पवयीन मुलांनी मागितले. मात्र, वासुदेव यांनी हॉयस्पॉट न दिल्याने त्यांनी रागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे तर एकाला अटक ही केली आहे. पोलीस तपासात ही माहिती समोर आली
वनराज आंदेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक
माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड ही गजाआड झाला आहे. या प्रकरणात आंदेकर यांच्या मेहुना जयंत कोमकार आणि गणेश कोमकार यांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.