शरद पवारांवर गुन्हा दाखल म्हणून बारामतीकरांकडून आज बारामती बंद
या कारवाईच्या निषेधार्ध आज बारमती बंदचं आवाहन केलंय. हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी...
बारामती : शिखर बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केलाय. ही कारवाई सुडबुद्धीनं करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. या कारवाईच्या निषेधार्ध आज बारमती बंदचं आवाहन केलंय. हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज बारामतीकर सकाळी १० वाजता शारदा प्रांगणात उपस्थित राहणार असल्याचं स्थानिक नेत्यांनी म्हटलंय.
राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांच्या विरोधात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं गुन्हा दाखल केला आहे. अजित पवारांसह राज्य सहकारी बँकेच्या ७० संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का समजला जात आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
आरोपानंतर शरद पवारांनी झी २४ तासशी संवाद साधला. मी कुठल्याही बँकेचा संचालक नव्हतो, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याबद्दल मला माहिती नाही, तसंच राष्ट्रवादीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तो पाहूनच असं घडेल अशी शंका मला होतीच, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलीय.