पुण्यात पुठ्ठा कंपनीला आग
आगीमुळे परिसरात धुराचे लोट
पुणे : पुण्यात पुठ्ठा कंपनीला शनिवारी सकाळी आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. हडपसरमध्ये सातव नगर परिसरात विवेकानंद इंडस्ट्रीअल भागात ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पुठ्ठा कंपनीला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार झाला होता.
तर दुसरीकडे, मुंबईतील पवई परिसरात राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री सूरभी चांदनाच्या घराला रात्री सव्वा दहाच्या सुमारास आग लागली होती. आगीत घराचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने घरात कुणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सफायर लेकसाईड बिल्डिंगमधील १६व्या मजल्याला ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी पोहचून पाऊण तासात संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान याबाबत बोलण्यास सूरभी चांदनाने नकार दिला. स्थानिकांच्या माहितीनुसार हे घर सूरभीने भाड्याने दिलंय. या घरात एक वृध्द दांपत्य राहतात. अभिनेत्री सुरभी चांदना सध्याच्या 'संजीवनी' या मालिकेत काम करतेय.
गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी अंबरनाथ पश्चिमेकडील अहमद उलन मिल या बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात आग लागल्याची घटना घडली होती. शुक्रवारी मुंबईत दादरच्या रणजीत स्टुडिओमध्ये अचानक आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग नियंत्रणात आली. आगीचे लोट दिसताच स्थानिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कळवलं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. स्टुडिओसमोरील एका ऑफिसलाही आग लागली होती.
याआधी डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मेट्रोपोलिटन केमिकल कंपनीलाही भीषण आग लागली होती. या आगीत संपूर्ण कंपनी भस्मसात झाली आहे.