खोपोली:  रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ जसनोव्हा कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २ जण ठार तर तीन जण जखमी झाले. यानंतर लागलेल्या आगीत अन्य दोन कंपन्यांचेही नुकसान झाल्य़ाची माहिती मिळत आहे. साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट परीसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्फोट इतका भीषण होता, की आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या घरांनाही हादरे बसले. त्यामुळे घरांचे नुकसान झाले. या स्फोटामुळे शेड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोटानंतर या परीसरात भीषण आग भडकली. ज्यानंतर आग विझवण्यासाठी कर्जत, खोपोली, पेण येथून अग्निशामन दलाचे १० बंब बोलवण्यात आले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना  यश आले.


 


आगीची झळ या परीसरातील इतर दोन कंपन्यांनाही बसली. पोलीस आणि महसुल विभागाचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.