Jaipur-Mumbai Express Firing Latest Update: धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 4 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रेल्वे पोलीस जवानानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये चेतन सिंह नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. या जवानाने आरपीएफच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाबरोबरच 3 प्रवाशांवर गोळीबार केला. एका सीआरपीएफ जवानानेच हा गोळीबार केला आहे. आरोपीला अटक करुन भाईंदर पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं आहे.


पालघर जिल्ह्याच्या हद्दीत घडला प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर ते विरार रेल्वे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसमध्ये या आरपीएफ जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळीबार केला. यावेळेस तेथे असलेल्या 3 प्रवाशांनाही गोळी लागली. गोळी लागलेल्या चारही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये हा गोळीबार झाला आहे.. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्यादरम्यान ही घटना घडली असून सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.


गाडी थांबली, डबा सील


बी-5 डब्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. आरपीएफ जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 3 नागरिकांना देखील गोळ्या लागल्या. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही गाडी सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये थांबवण्यात आली आहे. ज्या बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला तो डबा सील करण्यात आला आहे. रेल्वेचे अधिकारी, पश्चिम रेल्वेचे अधिकारी सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये जिथे गाडी उभी करण्यात आली आहे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. बोरीवली रेल्वे स्थानकामध्ये चारही मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. शताब्दी रुग्णालयामध्ये हे मृतदेह नेले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु.



अनेकांना उतरल्यानंतर समजलं काय घडलं


या गोळीबारामगील कारण समोर आलेलं नाही. मात्र पोलीस सध्या ट्रेनच्या डब्याची तपासणी करत आहे. या गाडीमधील सर्व रेल्वे प्रवाशांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून खाली उतरवण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं याची माहिती अनेक प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आल्यानंतर मिळाल्याचं समजतं. आपल्याला कोणताही गोळीबाराचा आवाज आला नाही असं इतर डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहे. त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला आणि नेमकं काय घडलं याचा तपास केला जात आहे.