कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलामध्ये वर्षभरापूर्वी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट खेळपट्टीवर मध्यंतरी आयपीएल संघातील खेळाडूंनी सराव केला गेला होता. यापाठोपाठ आता याठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सी.के.नायडू करंडक स्पर्धेतील मुंबई विरुद्ध बंगाल या संघांचा सामना खेळविला जाणार आहे. या संकुलामध्ये २२ वर्षांपूर्वी रणजी करंडक स्पर्धेतील क्रिकेट सामने झाले होते. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारच्या मोठय़ा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन याठिकाणी होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात १९९७ मध्ये रणजी करंडक सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर याठिकाणी एकही मोठय़ा क्रिकेट स्पर्धेचा सामना झाला नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेचा पांढरा हत्ती म्हणून या क्रीडा संकुलाची ओळख निर्माण झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नदीम मेमन यांच्या मदतीने वर्षभरापूर्वी क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्यात आलं. ५ ते ८ जानेवारी दरम्यान या मैदानामध्ये सी. के. नायडू करंडक स्पर्धेतला मुंबई विरुद्ध बंगाल संघाचा सामना खेळवला जाणार आहे. 


सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील मुंबई विरुद्ध बंगाल संघाचा सामना दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातल्या सामन्याचा संपूर्ण खर्च बीसीसीआय करणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला मैदानाच्या भाडय़ातून उत्पन्नही मिळणार आहे.