या जिल्ह्यात घातक पद्धतीने मासेमारी, खवय्यांच्या आरोग्याला धोका
नदीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
मुंबई : नदीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात (Kolhapur) उघड झालाय. त्यामुळे नदीतील जीवसृष्टी संकटात आली आहेच, पण हे मासे खाणाऱ्यांनाही धोका निर्माण झालाय. (fishing is caught by throwing bleaching powder in the river at kolhapur)
नद्यांमध्ये अत्यंत घातक पद्धतीनं मासेमारी सुरू असल्याचं समोर आलंय. नदीत ब्लिचिंग पावडर टाकून मासे पकडले जातायत. यामुळे नदीमधील जीवसृष्टी संकटात आली आहेच, पण हे मासे खाल्ल्यानं माणसांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत हा जीवघेणा प्रकार सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय.
मासेमारी करायला गेल्यावर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकली जाते. ल्बिचिंग पावडर टाकल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घसरते आणि मासे तडफडतात. त्यामुळे गळ किंवा जाळं टाकून मासे पकडणं सोपं जातं.
मात्र यामुळे नदीची इकोसिस्टिम बिघडत चालली आहे. तसंच नद्यांमधील जलसृष्टी संपुष्टात येण्याची भीती आहे. एवढंच नव्हे, तर हे मासे खाल्ल्यानं मानवी आरोग्यासही धोका होऊ शकतो.
कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा आधीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्यात सोप्या पद्धतीनं मासे पकडण्याच्या लोभात नवशिके मच्छिमार घातक रसायनं नदीत मिसळतायत. प्रशासनानं याचा तातडीनं बंदोबस्त करायला हवा.