सांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
सांगली : पुरानंतर पाचव्या दिवशी मुख्यमंत्री पूरग्रस्तांच्या बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी सांगलीत दाखल झाले. मात्र सांगलीतल्या सांगलवाडीत मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री सांगलवाडीत दाखल होता. उद्ध्वस्त पूरग्रस्तांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
पूरग्रस्तांना मदत करताना राजकारण
तर दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांना मदत देतानाही कसं राजकारण केलं जातं, याचं आणखी एक दुर्दैवी उदाहरण समोर आले आहे. भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी पूरग्रस्तांसाठी मदत पाठवून दिली. पण मदत साहित्यावर आवर्जुन प्रचाराचे स्टिकर लावायला ते विसरले नाहीत. पूरग्रस्तांसाठी पाठवलेल्या अन्नधान्यावर आमदार सुरेश हाळवणकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टिकर लावण्यात आलेत. महाराष्ट्र सरकारच्यावतीने ही मदत दिली गेली, असा उल्लेख या स्टिकरवर करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार मदतकार्यातही राजकीय स्वार्थ जपत असल्याची टीका होत आहे.
मदतीसाठी महिलेचा आक्रोश
एकीकडे राजकारण होत असताना मदतीसाठी आक्रोश सुरु आहे. एक हृदयद्रावक बातमी. गेल्या सहा दिवसांपासून घरातली माणसे पुरामध्ये अडकून पडल्याने एका महिलेने टाहो फोडलाय. तिचा आक्रोश मदत करणाऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. शकिला शेख असे या पूरग्रस्त महिलेचे नाव आहे. सांगलीच्या संभाजी नगरमध्ये हरिदास सुपर मार्केटजवळ तिचा मुलगा, सून आणि नातवंडे गेल्या सहा दिवसांपासून घरात अडकलेत. त्यांना महापुरातून बाहेर काढा, असा आक्रोश ती जीवाच्या आकांतानं करत आहे.
पूरग्रस्तांची होतेय लूट
पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात सध्या दूध, पाणी, भाजीपाला आणि पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवत आहे. पुराचं पाणी ओसरल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सांगलीकरांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. तर दुसरीकडं भाजी आणि दूध विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर उकळून ग्राहकांची लूट चालवली आहे. महापुरात अर्ध्यापेक्षा अधिक सांगली जलमय झाली. व्यापारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापार्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्त्यावर पाणी असल्यानं दूध, फळे, भाजीपाला, पेट्रोल, डिझेलची वाहतूक ठप्प झाली. काही पेट्रोलपंपावरील पेट्रोल, डिझेल संपले आहे. तर शिल्लक असणार्या पंपावर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. महापालिकेकडून पाणी पुरवठा होणार नसल्यानं अनेक ठिकाणी पेयजल केंद्रावर पाणी घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्यात. दरम्यान, चौथ्या दिवशीही सांगली शहराला पुराचा विळखा कायम आहे.