पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावं लागले. टांगेवाला कॉलनीत चंद्रकांत पाटील गेले असता, तिथल्या नागरिकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या भागात कुठलीच मदत पोहोचली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून चंद्रकांत पाटलांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. चंद्रक्रात पाटील यांनी मात्र असे काही घडलेच नसल्याचे म्हंटले आहे. काही लोक पूर परिस्थितीचे राजकारण करताहेत. आताही पुण्यात तो प्रयत्न झाल्याचं त्यांनी सांगितले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी बिबवेवाडी, अरण्येश्वर भागातील परिस्थितीची पाहणी करून तिथल्या नागरिकांशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या पावसात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध विविध यंत्रणांच्या माध्यमातून घेतला जातोय.  कोल्हारवाडी, अरण्येश्वर, वानवडी यासह विविध भागात शोधमोहीम सुरु आहे. पुण्यात पाऊस कोसळून दीड दिवस संपला तरी महापालिकेची यंत्रणा  मदत करण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट होते आहे. नागरिकांना वीज, पाणी मिळत नाही तर दुसरीकडे गाळ, कचरा काढण्यासाठीचीही यंत्रणा अपुरी आहे. मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे अनेक भागांमध्ये विविध संस्थांकडून स्वच्छतेचे काम करण्यात येते आहे. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्यावतीने अनेक तरुणांनी यात पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवलीय. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून उशीर झाल्याने त्यांना नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले.


अरणेश्वर चौकात संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सकाळीच आंदोलनाचा पवित्रा घेत रस्ता अडवला होता. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना बाजूला केले आणि रस्ता मोकळा केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणच्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. या वेळी संतप्त नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवित त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.