कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजारो लोक पुरात अडकले आहेत. कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर आहे. NDRF, नौदल आणि लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. त्यांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील पुराची स्थिती बिकट झाली आहे. २२ टीम या कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. यात NDRF च्या पाच, नौदलाच्या १४ तर तटरक्षक दल दोन आणि लष्कराची एक टीम कार्यरत आहे. सांगलीमध्ये ११ टीम मदतकार्य करत आहेत. यात NDRF च्या  आठ, तटरक्षक दलाच्या दोन आणि लष्कराची एक टीम काम  करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NDRF च्या पाच टीम पुण्यात पोहोचल्या आहेत. तर दोन कोल्हापूरला पोहोचत आहेत. आणि एक सांगली आणि एक पुण्याला पोहोचत आहे. दोन तटरक्षक दलाच्या टीम कोल्हापूरला पोहोचल्या आहेत. तसेच नौदलाच्या पाच टीम सांगलीला पोहोचत आहेत. यांच्यामदतीने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. तर राज्य सरकारने आणखी पाच NDRF च्या टीमची मागणी केंद्राकडे केली आहे. 


सांगली शहराला पुराचा मोठा फटका बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मात्र बोटींची कमतरता असल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. सामाजिक संस्था आणि तरुण हे आपल्या जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्याचे आणि त्यांना खाद्यपदार्थ पुरवण्याचं काम करत आहेत. शिरोळजवळच्या अर्जूनवाड गावाला पूर्ण पाण्याचा वेढा पडलाय. चारशेहून अधिक लोक अडकून पडलेत. मदतकार्य पोहोचण्यात पुरामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. 


अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. अलमट्टी धरणातून पाणी सोडल्यास सांगली आणि कोल्हापूरला पुरापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पाण्याची पातळी कमी होत नसल्यानं प्रशासन चिंतेत आहे. मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत.