अन्नातून विषबाधा : सख्ख्या तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
कराड (Karad) तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अन्नातून विषबाधा (Food poison) होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : कराड (Karad) तालुक्यातील सैदापूर येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन बहिणींचा अन्नातून विषबाधा (Food poison) होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. कुटुंबियांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तीन मुलींसह आईला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या तिन्ही मुलींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आस्था सासवे (९), आयुशी सासवे (३), आरुषी सासवे (८) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. सैदापूर येथील मिलिटरी होस्टेल शेजारी सासवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता सासवे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले. मात्र मध्यरात्री एकच्या सुमारास शिवानंद सासवे यांची पत्नी आणि आरुषी, आस्था आणि आयुषी या चौघीना उलटी आणि जुळबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे चौघांनाही उपचारासाठी कराड येथे कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर आस्था आणि आयुषी यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला तर आरुषी हिचा कृष्णा रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या सगळ्यांनी सोमवारी जेवताना बाहेरून आणलेली बासुंदी खाल्ली होती, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र या मुलींचे मृत्यू नेमके कसे झाले, यासाठी त्याचे उत्तरीय तपासणी करून व्हिसेरा पुणे प्रयोग शाळेला पाठवण्यात आले आहेत. नेमकी विषबाधा झाली की केली गेली, याचा देखील कराड पोलीस शोध घेत आहेत.