Weather Update In Marathi: नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना उजाडला तरीदेखील यंदाच्या हिवाळ्यात थंडी कमी असल्याचे जाणवत आहे. पहाटे हवेत गारठा जाणवत असला तरी  दुपारी उन्हाचे चटके जाणवतात. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता कमी आहे. डिसेंबरच्या महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी घेतलेल्या परिषदेत ही माहिती दिली आहे. महापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कडाक्याची थंडी पडण्याची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता कमी आहे. 1901 नंतर तिसरा सर्वाधिक उष्ण नोव्हेंबर म्हणून नोंद झाली आहे. भारतात 1901मध्ये फेब्रुवारी, ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे सर्वात उष्ण महिने म्हणून नोंदवले गेले गोते. त्यानंतर आता 2023 मध्ये पुन्हा याची पुर्नावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. 


अल नीनो, बगालच्या खाडीत निर्माण होणारे चक्रीवादळ यासारखे घटनांमुळं देशातील अनेक भागात परिणाम जाणवेल. त्यामुळं यंदाच्या मौसमात थंडी कमी जाणवेल. यंदाच्या हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे. मध्य आणि उत्तर भारत वगळता उर्वरित देशात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. 


महाराष्ट्रातील तापमान कसे असेल?


महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यंदाचा नोव्हेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. तर, डिसेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज आहे. पाऊस कमी पडल्यामुळं किमान तापमान देखील अधिक राहील. महाराष्ट्रातील काही भागात पावसाने थैमान घातल्याने थंडी आणि अचानक उकाडा वाढला आहे. 


यंदाचे सर्वात उष्ण वर्ष


यंदाचे वर्ष हे 147 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण ठरण्याचा अंदाज आहे. यंदा जागतिक तापमानात सुमारे 1.40 अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळं यंदाचे वर्ष हे आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरणार आहे. यंदा जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिनेही सरासरीपेक्षा उष्ण ठरले आहेत.