Maharashtra Weather Update : सध्या थंडीचा मौसम बदलत उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. यामुळेच रात्री थंडी (Cold), दिवसा भयानक उष्णता (Heat Wave) अशा वातावारणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता  पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने तसा अलर्ट दिला आहे. राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज (Rain alert) वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. विशेषत: आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 ते 6 मार्च दरम्यान राज्यातल्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं ही शक्यता वर्तवलीय. फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.  वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे.  


विदर्भात 6 मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 5 मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळू शकतो.  उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.  औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होण्याचं चित्र नाहीच, सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस अतिशय कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळणार नाही. 


दिवसा उकाडा आणि रात्री थंडी


राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था राज्यातील काही भागात दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या सुरवाती पासूनच उन्हाचा चटका वाढणार आहे. अनेक भागात तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांनी दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये अस आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यातच आता पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 


उष्णतेने गेल्या 146 वर्षांचा रेकॉर्ड मोडला


उष्णतेने गेल्या 146 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. फेब्रुवारीत संपूर्ण देशात तापमान प्रचंड वाढलंय. 1877 नंतर प्रथमच फेब्रुवारीत पारा एवढा वर गेलाय. देशात सरासरी तापमान 30 अंशांवर आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा हा प्रकार असल्याचं आयएमडीने म्हटलंय.