Ashok Chavan Resigns from Congress: मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला असून, त्यांनी तो स्विकारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्र सोपवत राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. या पत्रात त्यांनी आपण 12 फेब्रुवारी रोजी मध्यान्हानंतर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं. तसंच माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख करत आपण आमदारकी सोडत असल्याचंही स्पष्ट केलं आहे. 



अशोक चव्हाण भाजपात प्रवेश कऱणार?


अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पण अद्याप याबाबत भाजपा किंवा अशोक चव्हाणांनी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. पण केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत उद्या म्हणजेच मंगळवारी अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांना राज्यात मंत्रीपद देण्यास भाजपाच्या नेत्यांचा विरोध असल्याने त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.



केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अमित शाह 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


काँग्रेसमधील अनेक नेते मोठे संपर्कात - देवेंद्र फडणवीस


अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाबद्दल विचारण्यात आलं असता, मला तुमच्याकडूनच ही माहिती मिळाली असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी  जास्त भाष्य करण्यास नकार दिला. 


"काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस गेल्या काही वर्षात वाटचाल करत आहे त्यातून कुठेतरी जनेतेचे नेते नाराज आहेत. ते पक्षात गुदमरत आहेत. मुख्य प्रवाहात काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे देशभरात एक ट्रेंड सुरु आहे. जनतेचे नेते अशी ओळख असणारे भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते भाजपाकडे येतील हा मला विश्वास आहे. आज मी इतकंच सांगू शकतो की, आगे आगे देखो होता है क्या," असं सूच विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 


आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. पण सगळ्याच पक्षातील लोक काही ना काही प्रमाणात संपर्कात असतात, आहेत. त्यांची पक्षात येण्याची इच्छा आहे. काहीजण निर्णय घेत आहेत, काही घेऊ शकत नाही आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.