Father Francis Dibrito Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. आज सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी विरारमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर देखील शोककळा पसरली आहे. ते धाराशीव येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी जेलाडी येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. अंत्यविधी मिस्सा हा आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली


ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते ख्रिस्ती धर्मगुरु, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचं योगदान दिलं आहे. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी तळमळीनं केलेलं काम सदैव लक्षात राहील. 


त्यांच्या निधनानं, पर्यावरणवादी विचारांचा कृतिशील साहित्यिक पडद्याआड गेले आहेत. मी त्यांच्या कुटुंबियांच्या तसंच अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे. अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


फ्रान्सिस दिब्रिटो यांचे शिक्षण


फ्रान्सिस दिब्रिटो यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं.  त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे.