पालघर : माजी आदिवासी विकास मंत्री,पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार दिनांक १० डिसेंबरला दुपारी १२ वाजता वाडा येथील निवासस्थानातून निघणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मितभाषी, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहीले होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणार्‍या जीवनाचा अस्त झाला आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. विष्णु सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले अशा शब्दात राज्यपालांनी दु:ख व्यक्त केली.



भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील असे ते म्हणाले.


भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती असे फडणवीस म्हणाले. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे ३० वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले असे सांगत फडणवीसांनी श्रद्धांजली अर्पण केली.