श्रीकांत राऊत, यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत वाशिम लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष असेल. इथून प्रहार संघटनेच्या तिकीटावर वैशाली येडे निवडणूक लढत आहेत. आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या त्या पत्नी... अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची बाजू तळमळीने मांडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाली येडे या यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या उदघाटक होत्या. त्या आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. शेतीतली नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली होती. मात्र परिस्थितीशी दोन हात करत वैशाली यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. त्याचसोबत एकट्याने आयुष्य जगणाऱ्या अनेक शेतकरी पत्नींनाही धीर दिला. साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषणही गाजलं होतं. आता शेतकऱ्यांचा बुलंद आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. 


वैशाली येडे यांना दोन मुलं आहेत. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. राजूर इथे अंगणवाडी सहाय्यिका म्हणून त्या काम करतात. शेतकरी आत्महत्या या विषयावरील तेरवं या नाटकातही त्या प्रमुख भूमिका करतात. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी सर्वसामान्य नागरिक पुढे येत असल्याचं चित्रं आहे. अनेकांनी मदत निधी दिलाय. दुबईवरूनही मदतीचा धनादेश आलाय. कुणी प्रचार रथ पाठवलाय. तर कुणी रोख स्वरूपात मदत दिलीय. निवडणुकीसाठी उमेदवार देताना आर्थिक आणि बाहुशक्तीचा विचार होतो. त्यानंतर उमेदवारी दिली जाते. पण वैशाली येडे यांच्या उमेदवारीमुळे मात्र एक वेगळं उदाहरण प्रहार संघटनेनं घालून दिलं आहे.