अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  ब्लड ट्रान्सफ्यूजन केल्यानंतर 4 मुलांना HIVची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील एका बालकाचा मृत्यू झालाय. या मुलांना थॅलेसेमिया हा जेनेटिक रोग आहे. या आजारात नियमित कालावधीत शरिरातील रक्त संपूर्ण बदलावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रक्रियेत 4 मुलांना HIV आणि हेपिटायटीस बीचा व्हायरस असलेलं रक्त दिलं गेल्याचा आरोप झालाय. त्यानंतर FDAनं या प्रकरणी प्राथमिक तपासणी सुरू केली असून दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन आरोग्य विभागानं दिलंय. 


दूषित ब्लड दिल्यानेच मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नागपूरतल्या जरीपटका भागातील खासगी रुग्णालयात लहान मुलांची तपासणी केली असता यामध्ये चार मुलांना एचआयव्हीची ( HIV ) लागण झाली असल्याचं समोर आलं. 


थॅलेसेमियाच्या रुग्णांना ठराविक 15 दिवसांनी रक्त दिले जातं.  हे रक्त  ब्लड बँकमधून पुरवले जातं.  हे रक्त देत असताना काही तपासण्या केल्या जातात. मात्र यानंतरही मुलांना दुषित रक्ताचा पुरवठा कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. थॅलेसेमियामुळे आधीच चिंतेत असलेल्या पालकांवर एचआयव्हीमुळे मोठे संकट कोसळलं आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याचे आता काय होणार ही चिंता पालकांना सतावत आहे..ॉ याप्रकरणि दोषींवर कारवाईची मागणी होत असून आरोग्य विभागानेही चौकशीचे आदेश दिले आहेत.