ठाणे : शहरात ज्या ठिकाणी कमी पाणीपुरवठा होत आहे किंवा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, त्याठिकाणी महपालिकेच्यावतीने १५ जूनपर्यंत टँकरद्वारे निशुल्क पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रमजान ईदच्या काळात मुंब्रा येथे टँकरने निशुल्क पाणीपुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांमध्ये पाणीपुरवठ्यांच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आज याविषयी चर्चा केली. यावेळी ज्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने पुरविण्यात येणारा पाणीपुरवठा कमी आहे किंवा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जे लोक नियमितपणे पाणी कर भरतात त्याठिकाणी १५ जूनपर्यंत महापालिकेच्यावतीने टँकरद्वारे निशुल्क पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले.


'ठाण्यात ऑपरेटरच दलाल, पाण्याची आणीबाणी जाहीर करा'


शहरात ज्या ठिकाणी कमी पाणीपुरवठा होतो अशा ठिकाणांची यादी पाणीपुरवठा विभागाने तयार करावी आणि त्यानुसार पाण्याचे टँकर पुरवावेत. यासाठी वेळ पडल्यास खासगी टँकर ताब्यात घेवून त्यांच्यामार्फतही पाणीपुरवठा करावा, जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महापालिकेची वितरण व्यवस्था नसल्याने पाणीपुरवठा होत नाही त्या ठिकाणी सिटेंक्स टाक्या बसवून त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा तसेच ज्या ठिकाणी छोटे टँकर जात असतील त्या ठिकाणी छोट्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा असे सांगितले. 


दरम्यान मुंब्रा येथे रमजान ईदच्या काळात शुक्रवारी होणा-या शटडाऊनच्या काळात पहाटे ३ ते ६ या वेळेत टँकरने तसेच इतर दिवशी ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा झाला असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, असे जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.