प्रताप नाईक / कोल्हापूर : तिरुपतीवरुन कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मनाचा शालू पाठविण्याची एक प्रथा आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारंपरिक रितिरिवाजप्रमाणे हा सोहळा देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडल्यानंतर अंबाबाईला अर्पण करण्यात आला. कोरोनामुळे एकीकडे अजूनही महाराष्ट्रातील मंदिर बंद आहेत मात्र तिरुमल्ला देवस्थानने यावर्षी सुद्धा शालू पाठवून ही प्रथा कायम ठेवली आहे. यावेळी तिरुमल्ला देवस्थानचे भास्कर रेड्डी आणि इतर मान्यवर तिरुपतीवरुन कोल्हापुरात खास विमानाने हा शालू घेऊन आले होते. 



यावेळी शालू घेऊन आलेल्या तिरुमल्ला देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी आणि त्यांच्या पत्नी स्वर्णलता रेड्डी यांच्यासह गोपीनाथ जेट्टी, धर्मा रेड्डी, प्रशांती रेड्डी यांचे पारंपरिक रितिरिवाजाप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिवाय अंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान सुद्धा यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. तिरुपतीवरुन अंबाबाई देवीला आलेल्या या आहेराला मोठं महत्व असून कोरोनाच्या या महामारीच्या संकट काळात सुदधा तिरुपती देवस्थानने ही प्रथा कायम ठेवली आहे.