बुलडाणा, लोणार : काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव काल श्रीनगरहून दिल्लीत आणले होते. ते आज जवानांच्या घरी पाठवले जात आहेत. बुलडाणामधील मलकापूर येथे शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. वंदे मातरमच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. जमलेल्या समुदयामध्ये संतापाची भावना दिसून येत होती. शहीद संजय राजपूत यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्ह्यातुन तरुणांची गर्दी मलकापूर येथे पहिल्यांदाच रेकॉर्डब्रेक गर्दी  जवळपास एक ते सव्वा लाखांच्या आसपास अंत्यदर्शनासाठी गर्दी जमली आहे. तसेच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले गेले आहे. लोणारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. याठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 नितीन राठोड यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप


बुलडाणा जिल्ह्यातले चोरपांगरा गावातले नितीन राठोड यांना साश्रू नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पुलवामा हल्ल्य़ात राठोड यांना हौतात्म्य आलं. नितीन राठोड़ यांच्या मूळगावी चोरपांगरा इथे त्यांचे पार्थिव शासकीय इतमामात आणण्यात आलं. यावेळी ग्रामस्थांच्या भावनांचा बांध फुटला. असंख्य लोक रस्त्यात रडताना दिसले. हुतात्मा राठोड अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ज्या गावात हुतात्मा राठोड लहानाचे मोठे झाले. त्या गावात त्यांना मानवंदना देण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली. पंचक्रोशीतून या गावाकडे पहाटेपासूनच ग्रामस्थांची रिघ लागली होती. अंत्यसंस्कारासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संभाजी निलंगेकर,स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर,खासदार प्रताप जाधव,राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे,सिंदखेडराजाचे आमदार शशिकांत खेडेकर,आमदार संजय रायमूलकर,जिल्हाधिकारी,अतिरीक्त पोलीस अधीक्षक,पोलीस उपअधीक्षक उपस्थित होते.


 


संजय राजपूत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद संजय राजपूत यांना मानवंदना देण्यासाठी अभूतपूर्व गर्दी गावात उसळली. शहीद संजय राजपूत यांचं पार्थिव गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. शहीद संजय राजपूत अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शहिदाच्या मृतदेहाच्या पायाला हात लावून अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. ज्या गावात संजय राजपूत यांनी आपलं बालपण घालवलं, आपली उमेदीची वर्ष घालवली त्या गावात आज त्यांची अंत्ययात्रा निघाली. संजय राजपूत यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, आप्तस्वकीय यांना यावेळी पार्थिव पाहून अश्रू अनावर झाले. संजय राजपूत अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. जवानांवर अशा प्रकारे भ्याड हल्ला कऱणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.