आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : १ कोटी ४० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्याच्या निधनाची पुष्टी करण्यात आली आहे. नक्षल संघटनेने पत्रक काढून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. कॉम्रेड रामन्ना असे त्याचे नाव असून त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र-छत्तीसगड-तेलंगणा-ओडिशा या राज्याच्या सीमावर्ती भागात दहशत असलेल्या नक्षल नेता रामन्ना यांचा मृत्यू झालाय. सध्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागात त्याच्या सक्रिय कारवाया होत्या. छत्तीसगड राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची अखेर पुष्टी केली आहे. या आठवड्यात रामन्ना याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती पोलिसांना विविध स्त्रोतांकडून मिळाली होती.  


मात्र यासंदर्भात नक्षल संघटनेच्या वतीने कुठलेही भाष्य करण्यात आले नव्हते. आता नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या माध्यमातून एक पत्रक काढून त्याला श्रद्धांजली वाहत त्याच्या चळवळीसाठी केलेल्या कामाची माहिती दिली गेली आहे. रामन्ना यांचा ताडमेटला भागातील जंगलात असलेल्या नक्षल कॅम्पमध्ये मृत्यू झाला.



विजापूर जिल्ह्यातील पामेड आणि बासागुडा या गावातल्या जंगलात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. रामन्नाच्या मृत्यूची माहिती मिळविण्यासाठी बरेच पुरावे सापडले आहेत. मात्र पोलीस अजूनही यासंदर्भात अधिक माहिती घेत आहेत. 


रामन्ना नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. गेल्या काही दशकांपासून बस्तर भागातील मोठ्या कारवायांचा तो मास्टर माइंड होता. २०१० मध्ये ताडमेटला येथे 76 सैनिकांचा मृत्यू आणि २०११ मध्ये दरभा खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला यात त्याचा समावेश होता.  


याच हल्ल्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शहीद झाले होते. रामन्ना तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. छत्तीसगड-महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्ये मिळून त्याच्यावर १ कोटी ४० लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याची पत्नी सावित्री उर्फ सोधी हिडमे ही  दक्षिण बस्तरमधील नक्षली नेत्यांपैकी एक प्रमुख आहे.  रामन्नाचा मुलगा रणजित आपल्या आईच्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून सक्रिय आहे.  


रामन्ना हा मध्य भारतातील नक्षलवादी घटनांचा मुख्य रणनीतिकार मानला जायचा. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात त्याने बराच काळ नक्षल चळवळीचे नेतृत्व केले होते. रामन्ना यांच्या निधनाने बस्तर भागातील नक्षली चळवळ दुर्बल होईल अशी पोलीस अधिकाऱ्यांची अटकळ आहे.