20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर
Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.
Gadchiroli Murder Case: गडचिरोली सध्या हत्याकांडामुळे चर्चेत आले आहे. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात 20 दिवसांत दोन महिलांनी आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. ही हत्या शांत डोक्याने आणि कोणालाही हत्येचा संशय येणार नाही, अशा पद्धतीने करण्यात आल्या. या हत्या नेमक्या कशा होत आहेत? याचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान पोलिसांनी आपल्या शोध मोहिमेचा वेग लावल्यानंतर घरातीलच 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. मामी रोजा रामटेके आणि तिची भाचेसुन संघमित्रा रामटेके यांनी मिळून हा प्लान केला. कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.
भाचेसून संघमित्रा रामटेके हिला तिचा पती आणि सासरच्यांकडून सतत टोमणे ऐकायला लागायचे. त्यामुळे त्यांना संपवणे हे संघमित्राचे लक्ष होते. तर मामी रोजा रामटेके हिचे वडिलोपार्जित मालमत्तेच्या विभाजनावरून कुटुंबासोबत तीव्र मतभेद होते. या दोन्ही महिलांचे लक्ष्य 16 जणांना मारण्याचे होते, असे सांगण्यात येत आहे.
26 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान एकापाठोपाठ एक कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली. हे मृत्यू वरकरणी नैसर्गिक वाटत होते. मारल्या गेलेल्यांना त्यांच्या संपूर्ण शरीरात मुंग्या येणे, पाठीच्या खालच्या भागात आणि डोक्यात तीव्र वेदना, काळे ओठ आणि जीभ जड वाटणे अशी लक्षणे जाणवत होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अशी सुरु झाली मृत्यूची मालिका
महागाव गावातील शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया कुंभारे 20 सप्टेंबर रोजी आजारी पडल्या. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली होती. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दोघांचा मृत्यू झाला. शंकर आणि विजयाच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली होती. दुसरीकडे शंकरचा मुलगा रोशन आणि मुलगी कोमल दहागौकर आणि आनंद (वर्षा उराडे) यांना अशीच लक्षणे आढळली. यानंतर त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय प्रयत्नांनंतरही 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
तेलंगणातून आणले विष
संघमित्रा आणि रोजा यांनी त्यांना विरोधक मानणाऱ्यांना संपवण्याचा कट रचला. रोजा हेवी मेटल विष घेण्यासाठी तेलंगणात गेली. तेथून परतल्यानंतर दोघांनीही हे जड धातू कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात आणि पाण्यात मिसळण्यास सुरुवात केली. शंकर आणि विजया पहिल्यांदा चंद्रपूरला गेल्यावर कुंभारे कुटुंबातील चालक नकळत बाटलीतील विषारी पाणी पिऊन आजारी पडला.
दिल्लीहून आलेला मुलगाही आजारी
आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी शंकर यांचा मुलगा सागर हा दिल्लीहून घरी आला. पण तोही आजारी पडल्याने कुटुंबाचा त्रास आणखी वाढला. शंकर आणि विजया यांना चंद्रपूरला घेऊन जाणारा फॅमिली ड्रायव्हरही आजारी असल्याने त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज होती. कुटुंबाला मदत करण्यासाठी चंद्रपूर आणि नागपूरला गेलेल्या एका नातेवाईकालाही अशीच लक्षणे दिसली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. हे प्रकरण नेमकं काय सुरु आहे, हे कोणालाच कळायला मार्ग नव्हता.
पोस्टमॉर्टममध्ये नाही आढळले विष
डॉक्टरांना विषबाधा झाल्याचा संशय असला तरी प्राथमिक तपासात त्याची पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, रोशनची पत्नी संघमित्रा आणि शंकरच्या भावाची पत्नी रोजा रामटेके यांनी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. अचानक झालेले गूढ मृत्यू आणि अस्पष्ट आजारांमुळे चिंतेत असलेल्या पोलिसांनी तपासासाठी पाच पथके तयार केली.