ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli Crime) जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या (Thackeray Group) एका महिला नेत्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात (Gadchiroli Police) जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद हिची तिच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली आहे. हा थरार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास राहतच्या वडिलांनी उठून पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात जात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
राहत सय्यद (30) यांची त्यांचा पती ताहेमिम शेख (38) याने चाकूने भोसकून हत्या केली. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर ताहेमिमने चाकूने भोसकून राहतची हत्या केली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राहत यांचे वडील नजद गुलाब सैय्यद झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नजद गुलाब सैय्यद हे कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक असून राहत ही त्यांची मुलगी होती.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती ताहेमिम शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनीच लगेच ताहेमिम अटक केली आहे. आरोपी ताहेमिम शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून घरी आला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर ताहेमिम आणि राहत हे दाम्पत्य नजद गुलाब सैय्यद यांच्या घरी मजल्यावर राहात होते.
दरम्यान, कोणत्या कारणामुळे राहतची हत्या झाली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कारवाई सुरू आहे.