आशीष अम्बाडे, झी मीडिया,गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात दुर्गम कृष्णार येथील युवकाला मृत्यूनंतरही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त युवकाचा मृतदेह चक्क खाटेवर बांधून दुचाकीवरुन नेला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे क्षयरुग्ण उपचारासाठी शासनाच्या ढीगभर योजना असताना युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गणेश तेलामी असे या मयत रुग्णाचे नाव आहे. 


गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 20 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.


देशात क्षयरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम चालविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत आहे. टीबीचे निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे, वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला. त्याचे शव दुचाकीवरून नेण्यात आले. 


हा प्रकार लक्षात येताच खडबडुन जागे झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत शव गावात पोहोचले होते. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिनस्थ कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. असे असले तरी जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग काय करत होता? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. 


बारमाही रस्ते संपर्क नसल्याने रुग्णाला कावड करून रुग्णालयात पोचविणे, गर्भवती महिलेला 10-10 किमी पायी यावे लागणे, प्रसूतीवेदना सुरू झालेल्या महिलेला खाटेवर न्यावे लागणे या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व घटना राज्यातल्या राजकीय धुरळ्यात दुर्लक्षिल्या जात आहेत हे मात्र नक्की.