Split in Family due to Shinde and Thackeray Camp : शिवसेना फुटली तशी शिवसैनिकांमध्येही फूट पडली. या फुटीचं पेव हाडाच्या शिवसैनिकांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर ( Gajanan Kirtikar Joined Shinde Camp) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर ( Amol Kirtikar ) हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम आहेत. नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वडिलांसोबत शिंदे गटात न जाता अमोल किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचंच ठरवलंय. खुद्द गजानन किर्तीकरांनीच मुलाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. ( Maharashtra Politics )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण किर्तीकर कुटुंब एकटं नाही ज्यांच्यात शिंदे-ठाकरे वादामुळे फूट पडलीय. यामध्ये नंदुरबारचे विजय पराडके आणि गणेश पराडके, बुलडाण्याचे प्रतापराव जाधव आणि संजय जाधव आणि पाचोऱ्याचे किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांचाही समावेश आहे.  


 



 



 



 


नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हाप्रमुख गणेश परडके यांनी उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांचे मोठे बंधू विजय पराडकेंनी मात्र शिंदे गटाला साथ दिलीय.


शिवसेना फुटीनंतर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेंच्या तंबूत दाखल झाले. मात्र दुसरीकडे त्यांचे भाऊ संजय जाधव यांनी मात्र भावाची साथ सोडून ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. प्रतापराव जाधव यांनी उपनराध्यक्षपद देताना संजय जाधव यांना डावलल्यानं त्यांनी मूळ शिवसेनेतच राहणं पसंत केल्याचं बोललं जातंय.


भावा-भावांमध्ये असा संघर्ष सुरू असताना त्यात बहिणीही मागे नाहीत हेही दिसून येतंय. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. तर दुसरीकडे त्यांची चुलत बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचं सांगितलंय.


भावा-बहिणीतली फूट कमी होतीय म्हणून की काय, यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनीही उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. 


भाऊबंदकी, कुटुंबातला वाद तसा राज्यासाठी नवीन नाही. त्यामुळे शिंदे-ठाकरे फुटीचे पडसाद तळागाळापर्यंत उमटणं स्वाभाविक आहे. अर्थात हा कुटुंबातला वाद राजकारणापुरताच मर्यादित राहावा हीच अपेक्षा.


gajanan kirtikar joined shinde camp split in home due to shinde and thackeray split maharashtra politics