मुंबई : राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना गालबोट लागले. राज्यभरात झालेल्या दुर्घटनांमध्ये २३ भाविकांना जलसमाधी मिळाली. यापैकी अमरावतीमध्ये चार, नाशिकमध्ये तीन, राजापूरात तीन, तारकर्ली, अहमदनगर, नागपूरमध्ये प्रत्येकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तसेच वाशिम, बुलढाणा, नांदेड, शहापूर, कराड, वर्धा, भंडाऱ्यातील दुर्घटनेतील गणेशभक्तांचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीमध्ये गणेश विसर्जन दरम्यान नदी पात्रात चार जण बुडाले. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील ही दुर्घटना आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक पोहोचले असून अद्यापही बुडालेल्या गणेश भक्तांचा शोध लागलेला नाही. विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवताना इतर तीन तरुण बुडाल्याची घटना घडली. या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्येही विसर्जनावेळी तीन आणि सिंधुदुर्गात दोन तरुण बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे गणपती विसर्जनाच्या वेळी दहा वर्षांचा आर्यन इंगळे पाण्यात बुडाला. नदीपात्रात त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पथकासह तहसिलदार पोहोचले. त्यांच्याकडून शोध घेण्यात येत होता.


नाशिकमध्ये गणपती विसर्जन करताना तीन तरुण गोदावरी नदीत बुडालेत. नाशिकच्या गंगापूर गाव परिसरातील ही घटना असून दोघांना वाचवण्यात यश आहे. तर तिसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.


दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये भोपाळच्या खटलापूर घाट येथे शुक्रवारी पहाटे गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले. पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.