मुंबई : पश्चिम रेल्वेने कोकणात सोडलेल्या गणपती स्पेशल गाडीच्या तिकीटांची बुकींग शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या आधीच सुरू झाल्याचा विचित्र प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम रेल्वेने नऊ गणपती स्पेशल गाड्या सोडल्या असून त्यापैंकी ट्रेन क्र. ०९००७ या गाडीचे बुकींग सकाळी ७.२१ वाजताच सुरू झाल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणात एका डाटा सुपरवायझरला बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकींग यंत्रणा भक्कम करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणच्या चाकरमान्यांना गणपती सणाचे वेध लागले असतानाच मध्य रेल्वेने १३२ तर पश्चिम रेल्वेने ४० विशेष फेर्‍या सोडल्या आहेत. या गाड्यांपैकी नऊ गणपती स्पेशल (ज्यात सहा पश्चिम रेल्वे तर तीन कोकणच्या गाड्या) गाड्यांची बुकींग शुक्रवार २० जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार होती. त्यापैंकी ट्रेन क्र. ०९००७ या गाडीचे बुकींग सकाळी ७.२१ वाजताच सुरू झाले.


विशेष म्हणजे सकाळी ७.१० वाजता देशभरातून १३५ तिकीटे ऑनलाइन बुक झाल्याचं उघड झालंय. यापैंकी ८ सप्टेंबर रोजीची १३ तिकीटे, १५ सप्टेंबरची ३ तिकीटे तर १० सप्टेंबरची ११९ तिकीटे अशी १३५ तिकीटे बुक झाली आहेत. त्यानंतर प्रवासी आरक्षण खिडक्यांतील उरली सुरली तिकीटे अवघ्या काही मिनिटांत संपली आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या हाती नेहमीप्रमाणे भल्या मोठी वेटिंग लिस्टची तिकीटे मिळाली आहेत. 


हा 'टायपिंग एरर'चा प्रकार आहे. डाटा एन्ट्री करताना २०१८ ऐवजी याच ट्रेन क्र.०९००७ या गाडीचे बुकिंगची तारीख सिस्टीममध्ये टाकताना २०१८ ऐवजी २०१७ अशी झाल्याने ही गफलत झाली आहे. या घटनेनंतर आयआरसीटीच्या यंत्रणेत योग्य ते बदल करण्यात येणार असल्याच रेल्वे अधिकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात डेटा सुपरवायझरला बडतर्फ करण्यात आले असून आठच्या आधीच ऑनलाइन बुक झालेल्या तिकिटांचे प्रवासी अधिकृत आहेत की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.