Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...
Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी काही दिवसांवर आलेली असतानाच या सणाच्या निमित्तानं गावची वाट धरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रस्ते मार्गानं कोकणात जाणाऱ्यांचा आकडा वाढला असून, एसटी बस, खासगी बस आणि सोबतच खासगी वाहनांचीही संख्या मोठी आहे. मुंबई गोवा महामार्गापासून अगदी पर्यायी मार्गांचा वापर करत सध्या शक्य तितक्या लवकर गाव गाठण्याचाच अनेकांचा प्रयत्न आहे. अशा सर्वच चाकरमान्यांच्या प्रशासनानंही कंबर कसली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. रायगड जिल्हयात मुंबई गोवा महामार्गावर 10 ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात येत आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना, चाकरमान्यांना कोणतीही अडचण किंवा आव्हानाची परिस्थिती उदभवल्यास या मदत केंद्रांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवासादरम्यान कोणताही अडथळा आल्यास ही केंद्र लक्षात ठेवणं प्रवाशांच्याच सोयीचं असेल.
मदत केंद्रांवर कोणत्या सुविधा?
गणेशोत्सवादरम्यान रस्ते मार्गानं गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा आकडा लक्षात घेता या मदत केंद्रांवर पोलीस मदत केंद्र, टोईंग व्हॅन, वाहन दुरूस्ती, वैद्यकीय सुविधा, बालक आहार कक्ष, महिलांसाठी फिडींग कक्ष अशा सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय प्रवाशांना चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस मोफत पुरवलं जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या केंद्रांची पाहणी करून आजपासून 4 सप्टेंबर 2024 पासून ही केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेसुद्धा वाचा : Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या
कुठे असतील ही सुविधा केंद्र ?
मुंबई गोवा माहामार्गावर रायगड टप्प्यात येणाऱ्या खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर, त्यानंतर पुढे टोलनाका आणि पोलादपूर इथं ही सुविधा केंद्र प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असतील. त्यामुळं अधिकाधिक प्रवाशांनी या केंद्रांमधील सुविधांचा लाभ घेत प्रवास सुकर करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
मुंबई- गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा
शनिवार, 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असल्या कारणानं अनेक चाकरमान्यांनी गावचा प्रवास सुरु केला आहे. मुंबई, नवी मुंबईतून मोठ्या संख्येनं खासगी आणि सरकारी वाहनांच्या माध्यमातून हा प्रवास सुरू असून, त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी येणाऱ्या बाजारपेठा, गावं आणि इतर काही कारणांनी जिथंजिथं रस्ता निमुळता होत आहे, तिथंतिथं वाहतूक कोंडीची समस्याही उदभवताना दिसत आहे. त्यामुळं रस्ते मार्गानं कोकणात जायचा बेत असेल तर, हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच निघणं उत्तम ठरेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.